- Hindi News
- मुंबई
- देशातील विजेच्या मागणीत ११.७ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्रात मार्चमध्ये २, १३७ मेगावॉट तुटीचा अंदाज
देशातील विजेच्या मागणीत ११.७ टक्क्यांची वाढ; महाराष्ट्रात मार्चमध्ये २, १३७ मेगावॉट तुटीचा अंदाज
वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आणि उन्हाच्या तीव्रतेमुळे वीज वापरात वाढ; संभाव्य टंचाई टाळण्यासाठी महावितरणचा बॅटरी ऊर्जा साठवणुकीवर भर

मुंबई : देशातील विजेची मागणी सातत्याने वाढत असून, चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत गेल्या वर्षाच्या तुलनेत ११.७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. वाढते औद्योगिकीकरण, व्यावसायिक क्षेत्रातील विजेचा वापर आणि वातानुकूलन यंत्रणांच्या वाढत्या वापरामुळे विजेची मागणी वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. इक्रा (इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी) च्या अंदाजानुसार, संपूर्ण आर्थिक वर्षात देशातील विजेची मागणी सुमारे ८.५ टक्क्यांनी वाढू शकते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मार्च २०२७ मध्ये सुमारे २, १३७ मेगावॉट विजेची तूट निर्माण होण्याची शक्यता असून, ही तूट भरून काढण्याचे आव्हान महावितरणसमोर असणार आहे.
इक्राच्या अहवालानुसार, नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या ११ दिवसांतही देशातील विजेच्या मागणीत मागील वर्षाच्या तुलनेत १२.९ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाढते तापमान, औद्योगिक उत्पादन आणि व्यावसायिक वापर ही मागणीवाढीची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे औष्णिक वीजनिर्मितीसाठी कोळशाचा पुरेसा साठा राखणे आणि वाढत्या मागणीनुसार वीजपुरवठा उपलब्ध करून देणे आवश्यक ठरणार आहे.
महाराष्ट्रातही विजेची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचत आहे. ऑक्टोबरमध्ये राज्यात आतापर्यंतची सर्वोच्च ३३ हजार ६२५ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. केंद्रीय विद्युत प्राधिकरणाच्या अंदाजानुसार, मार्च २०२७ मध्ये राज्याची सर्वोच्च मागणी ३६ हजार ८५८ मेगावॉटपर्यंत पोहोचू शकते. त्या तुलनेत उपलब्ध वीज ३४ हजार ७२१ मेगावॉट राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुमारे २, १३७ मेगावॉटची तूट निर्माण होऊ शकते.
बॅटरी साठवणूक प्रकल्पांचा विस्तार
संभाव्य वीजटंचाईवर मात करण्यासाठी महावितरणने सौरऊर्जेबरोबरच बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रकल्पांवर भर दिला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत राज्यात सुमारे सात हजार मेगावॉट क्षमतेचे विकेंद्रित सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. दिवसा निर्माण होणारी अतिरिक्त वीज साठवून संध्याकाळच्या वेळी वापरण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
राज्यात सध्या सुमारे ५० ठिकाणी प्रत्येकी १० मेगावॉट क्षमतेचे बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रकल्प कार्यान्वित आहेत. त्यांची एकत्रित क्षमता ५०० मेगावॉट असून, दोन तासांसाठी एक हजार मेगावॉट-अवर वीज साठवता येते. याशिवाय ७५० मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. त्यातून दोन तासांसाठी १, ५०० मेगावॉट-अवर वीज उपलब्ध होऊ शकेल. यापैकी एक हजार मेगावॉट-अवर क्षमतेचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच चार हजार मेगावॉट-अवर क्षमतेच्या अतिरिक्त प्रकल्पांचे कामही प्रगतिपथावर आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या म्हणण्यानुसार, दिवसा उपलब्ध होणारी अतिरिक्त सौरवीज साठवून संध्याकाळच्या वाढत्या मागणीच्या वेळी वापरण्यावर भर दिला जात आहे.
संध्याकाळच्या वीज मागणीवर विशेष लक्ष
सूर्यास्तानंतर सौर वीजनिर्मिती कमी होते; मात्र त्याचवेळी घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील विजेचा वापर वाढतो. अशा वेळी बॅटरीमध्ये साठवलेली वीज वापरल्यास पारंपरिक वीजनिर्मितीवरील ताण कमी होण्यास मदत होईल. तसेच खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करण्याची गरजही कमी होऊ शकते. मात्र, मार्च २०२७ मधील संभाव्य तूट भरून काढण्यासाठी बॅटरी साठवणुकीबरोबरच औष्णिक वीजनिर्मिती आणि अतिरिक्त वीजखरेदीचे नियोजनही महत्त्वाचे ठरणार आहे.
