- Hindi News
- अंतरराष्ट्रीय
- नेपाळमधील जनकपूर धाम आणि भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या साप्ताहिक रेल्वे सेवेला भारतीय रेल्वेची मं...
नेपाळमधील जनकपूर धाम आणि भारतातील अयोध्या यांना जोडणाऱ्या साप्ताहिक रेल्वे सेवेला भारतीय रेल्वेची मंजुरी..
सीमापार संपर्क व्यवस्था, धार्मिक पर्यटन आणि भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल
नवी दिल्ली प्रतिनिधी -
भारत-नेपाळ संपर्क व्यवस्था अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत, भारतीय रेल्वेने नेपाळमधील जनकपूर धाम आणि भारतातील उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या यांच्या दरम्यान नवीन साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
या सेवेमुळे रामायण परंपरेशी अत्यंत घनिष्ठ संबंध असलेले माता सीतेचे जन्मस्थान म्हणून पूजनीय असलेले जनकपूर धाम आणि प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान असलेले अयोध्या या दोन प्रमुख ठिकाणांमध्ये एक महत्त्वाचा रेल्वे दुवा प्रस्थापित होईल. या उपक्रमामुळे दोन्ही देशांतील प्रवाशांना या प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल आणि त्यांचा सामायिक सांस्कृतिक वारसा अधिक दृढ होईल.
सीमेपलीकडील प्रमुख ठिकाणांना परस्परांशी जोडणे
सुमारे 604 किलोमीटरचे अंतर कापणारी ही साप्ताहिक रेल्वे सेवा जनकपूर धामला अयोध्या कॅन्टॉन्मेंटशी जोडेल आणि या प्रवासादरम्यान ती बिहार व उत्तर प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या शहरांतून धावेल.
या रेल्वे गाडीला तिच्या अंतिम स्थानकांव्यतिरिक्त जयनगर, मधुबनी, शिशो, सीतामढी, रक्सौल, नरकटियागंज, गोरखपूर, बस्ती, मनकापूर आणि अयोध्या धाम येथे व्यावसायिक थांबे असतील.
ही सेवा आठवड्यातून एकदा उपलब्ध असेल, ज्यामध्ये जनकपूर धाम येथून शनिवारी तर अयोध्या कॅन्टोन्मेंट येथून सोमवारी ही गाडी सुटेल.
पर्यटन, व्यापार आणि प्रादेशिक विकासाला चालना
या नवीन सेवेमुळे यात्रेकरू, पर्यटक आणि इतर प्रवाशांसाठी सीमापार प्रवास अधिक सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे. यामुळे जनकपूर आणि अयोध्या दरम्यानचे धार्मिक प्रवास सुलभ होतील, रामायणाशी संबंधित पर्यटन सर्किट्सना प्रोत्साहन मिळेल आणि शिक्षण, व्यवसाय व कौटुंबिक कारणास्तव प्रवास करणाऱ्या लोकांना अधिक वाहतूक पर्याय प्राप्त होईल.
सुधारित रेल्वे संपर्कामुळे पर्यटन व्यावसायिक, आदरातिथ्य क्षेत्रातील आस्थापना, स्थानिक व्यापारी आणि पारंपरिक कारागीर यांच्यासाठी संधी निर्माण होऊन या मार्गावरील स्थानिक अर्थव्यवस्थांनाही लाभ होण्याची अपेक्षा आहे. बिहार आणि नेपाळच्या सीमावर्ती भागातील समुदायांसाठी ही सेवा प्रवासी वाहतुकीचा एक अतिरिक्त पर्याय उपलब्ध करून देईल आणि आर्थिक व सामाजिक संबंध अधिक मजबूत करेल.
भारत-नेपाळ मैत्री अधिक दृढ करणे
भारत आणि नेपाळमध्ये शतकानुशतके जुने सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक संबंध आहेत, ज्यामध्ये धार्मिक परंपरा आणि सीमापार सामुदायिक नातेसंबंध हा या भागीदारीचा अविभाज्य भाग आहे. रेल्वे संपर्क व्यवस्थेचा वापर करून समुदायांना अधिक जवळ आणत, ही नवीन रेल्वे सेवा द्विपक्षीय सहकार्याला एक नवा आयाम देईल.
या उपक्रमाच्या माध्यमातून, भारतीय रेल्वे प्रादेशिक पर्यटन, आर्थिक घडामोडी आणि दोन्ही शेजारील देशांमधील चिरस्थायी मैत्रीला पाठबळ देत प्रवासी संपर्क व्यवस्था विस्तारण्याचे काम निरंतर सुरू ठेवत आहे.
