- Hindi News
- अंतरराष्ट्रीय
- ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्...
‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत डीआरआयकडून पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त..
आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई
नवी दिल्ली -
भारताच्या पाकिस्तानमधून आयातीवरील बंदीला चुकविण्याच्या प्रयत्नांविरोधात मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाकिस्तानमधून आलेले 362 मेट्रिक टनांहून अधिक सुके खजूर जप्त केले आहेत.
विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय अधिकाऱ्यांनी नाशिक येथील सीएफएस अंबड येथे मुंबईस्थित कंपनीने आयात केलेले सुक्या खजुराचे 13 कंटेनर अडवले. ही मालवाहतूक संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली येथून आली होती. आयात कागदपत्रांमध्ये संयुक्त अरब अमिरातीचा मालाचा उगम/स्त्रोत देश म्हणून उल्लेख करण्यात आला होता.
प्राथमिक तपासात मालाचा पाकिस्तानमधील उगम लपविण्यासाठी काळजीपूर्वक आखलेली ट्रान्सशिपमेंट व्यवस्था उघडकीस आली. सुक्या खजुराची वाहतूक सुरुवातीला पाकिस्तानमधील कराची बंदरातून एका जहाजावरील एका संचातील कंटेनरमधून संयुक्त अरब अमिरातीतील जेबेल अली बंदरात करण्यात आली. जेबेल अली येथे हा माल केवळ ट्रान्सशिप करण्यात आला आणि दुसऱ्या संचातील कंटेनरमध्ये हलवून, वेगळ्या जहाजावर चढविण्यात आला. त्यानंतर पाकिस्तानी नागरिकांनी चालविलेल्या संस्थांच्या माध्यमातून भारताकडे पुढील वाहतुकीसाठी माल पाठविण्यात आला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी भारत सरकारने पाकिस्तानमधून थेट किंवा अप्रत्यक्षपणे उगम पावलेल्या किंवा पाकिस्तानमधून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर किंवा वाहतुकीवर संपूर्ण बंदी लागू केली. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाच्या (डीजीएफटी) 2 मे 2025 रोजीच्या अधिसूचना क्रमांक 06/2025-26 नुसार ही बंदी 2 मे 2025 पासून लागू झाली. त्यानंतर डीआरआयने “ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट” अंतर्गत तिसऱ्या देशामार्गे भारतात आणण्याचा प्रयत्न होणाऱ्या पाकिस्तानमधील मालाची सातत्याने ओळख पटवून, तो अडवून जप्त केला आहे.
ही जप्ती व्यापारबंदी चुकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या अत्याधुनिक नेटवर्कची ओळख पटविणे, त्यांना विस्कळीत करणे आणि त्यांचे उच्चाटन करण्यासाठी डीआरआयच्या सातत्यपूर्ण निर्धाराचे द्योतक आहे. चुकीची माहिती देणे, ट्रान्सशिपमेंट आणि कागदपत्रांमध्ये फेरफार करून व्यापारबंदी चुकविण्याच्या प्रयत्नांना आळा घालत, राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण आणि पुरवठा साखळीची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी डीआरआय कटिबद्ध आहे.
