- Hindi News
- अंतरराष्ट्रीय
- युरोपमधून टपाल सेवेद्वारे अवैधरीत्या पाठवलेले 10.8 किलो अॅम्फेटामाइन जप्त..
युरोपमधून टपाल सेवेद्वारे अवैधरीत्या पाठवलेले 10.8 किलो अॅम्फेटामाइन जप्त..
व्यापार मार्गांचा गैरवापर करणाऱ्या टोळीचा केला पर्दाफाश
नवी दिल्ली प्रतिनिधी -
विविध व्यापारी मार्गांवरील अविरत दक्षता कायम ठेवत, महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचा प्रयत्न यशस्वीरित्या हाणून पाडला असून, या कारवाईत 10.8 किलो ॲम्फेटामाइन जप्त केले. डीआरआय ने या कारवाईद्वारे अधिकृत टपाल मार्गांचा गैरवापर करून भारतात प्रतिबंधित पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला.

गुप्त माहितीच्या आधारे, डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी नवी दिल्लीतील फॉरेन पोस्ट ऑफिसमध्ये एका युरोपीय देशातून आलेले एक संशयास्पद पार्सल पकडले आणि त्याची तपासणी केली, यामध्ये "क्लेरेन" (कपडे) असल्याचे घोषित करण्यात आले होते. प्रारंभिक तपासणीत एका शिपिंग कार्टनमध्ये सर्वसामान्य घरगुती वापराचे कपडे आढळले, परंतु पॅकेजिंगची बारकाईने तपासणी केल्यावर वस्तू लपवण्याची एक गुंतागुंतीची पद्धत उघडकीला आली. पुठ्ठ्याच्या चारही बाजूंना प्रत्येकी दोन प्लॅस्टिकच्या पिशव्या कल्पकतेने लपवून ठेवल्या होत्या.
डीआरआय च्या अधिकाऱ्यांनी लपवलेली एकूण आठ पाकिटे जप्त केली, यात गुलाबी रंगाची पावडर होती. चाचणीनंतर ते ॲम्फेटामाइन असल्याचे उघडकीला आले. संशयित प्रतिबंधित पदार्थांची सर्व आठ पाकिटे नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स (एनडीपीएस) कायदा, 1985 च्या संबंधित तरतुदींनुसार जप्त करण्यात आली असून, या तस्करीशी संबंधित व्यापक नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
