- Hindi News
- मुंबईसाठी 'पाताळ लोक': ३१ किमी भुयारी मार्ग, ७० हजार कोटींचा महाप्रकल्प
मुंबईसाठी 'पाताळ लोक': ३१ किमी भुयारी मार्ग, ७० हजार कोटींचा महाप्रकल्प

मुंबई : मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडण्यासाठी तब्बल ३१ किलोमीटर लांबीचे एकात्मिक भुयारी रस्त्यांचे जाळे उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. ‘पाताळ लोक’ असे नाव देण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गुरुवारी (१९ नोव्हेंबर) झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या प्रकल्पाचे सादरीकरण केले. मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, विमानतळ तसेच प्रमुख व्यावसायिक केंद्रांना भुयारी मार्गांनी जोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रस्तावित भुयारी मार्गांचे जाळे वांद्रे-वरळी सागरी सेतू, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी), बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानक, धारावी, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२ तसेच पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणार आहे. त्यामुळे मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांदरम्यान थेट संपर्क निर्माण होण्यास मदत होणार आहे. तसेच विमानतळ आणि बीकेसी परिसरात पोहोचणे अधिक सोपे होणार आहे. बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर बीकेसी परिसरातील वाहतुकीचा ताण आणखी वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने आयएएस अधिकारी आणि वाहतूक समिती स्थापन केली होती. या समितीच्या माध्यमातून मुंबईतील भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून विविध उपाययोजनांवर काम करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) भाईंदर-उत्तन-विरार कॉरिडॉरसाठी सुधारित मार्गरेषाही सादर केली आहे. प्रस्तावित मुंबई-वाढवण द्रुतगती मार्गाशी या प्रकल्पाची जोडणी करण्यात येणार आहे. भाईंदर-उत्तन ते विरार दरम्यानच्या सागरी पुलाला यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे. या सागरी पुलाच्या मार्गासाठी दोन पर्यायी मार्गरेषा तयार करण्यात आल्या असून, बैठकीत या दोन्ही पर्यायांवर चर्चा करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पूर्व-पश्चिम संपर्कासोबतच भाईंदर, उत्तन आणि विरार परिसरातील वाहतूक व्यवस्थेच्या विकासालाही महत्त्व मिळणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने हे दोन्ही प्रकल्प महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा आहे.
