- Hindi News
- जळगाव
- हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या एरंडोलच्या ऐतिहासिक ‘ नथ्थू बापू उरूस ’ उत्सवास २९ नोव्हेंबरपा...
हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या एरंडोलच्या ऐतिहासिक ‘ नथ्थू बापू उरूस ’ उत्सवास २९ नोव्हेंबरपासून प्रारंभ.!
मानाच्या भगव्या चादरीची भव्य मिरवणूक, कापडी घोड्यांचे नवस अन् जंगी कुस्त्यांची भाविकांना पर्वणी.!

एरंडोल (प्रतिनिधी) : धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदू-मुस्लिम बंधुभावाचा संदेश देणाऱ्या एरंडोल शहरातील पारंपरिक व ऐतिहासिक ‘ नथ्थू बापू उरूस ‘ उत्सवास येत्या रविवार २९ नोव्हेंबर २०२६ पासून मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात प्रारंभ होत आहे. शहरातील बुधवार दरवाजा परिसरात भरणारा हा मुख्य उत्सव चार दिवसांचा असला तरी यात्रेची ही धूम पुढील १० ते १५ दिवस अविरत सुरू राहणार आहे.
नथ्थू बापू हे एक महान अवलिया होते. ते हातात लाकडी काठीचा घोडा घेऊन संपूर्ण गावात भ्रमंती करत असत, अशी लोकआख्यायिका प्रसिद्ध आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजांचे श्रद्धास्थान असलेल्या नथ्थू बापूंच्या बुधवार दरवाजा परिसरातील समाधीवर नवस फेडण्यासाठी व नवीन नवस बोलण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागते. दर्शनाच्या वेळी समाधीवर शिरणी, बत्तासे, चादर आणि विशेषतः ‘ कापडी घोडा ‘ अर्पण करण्याची अनोखी व शेकडो वर्षे जुनी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जाते.
उरूस उत्सवानिमित्त एरंडोल येथील ‘ पांडवनगरी बहुउद्देशीय संस्था ‘ व उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही ढोल-ताशांच्या गजरात आणि वाजतगाजत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीद्वारे नथ्थू बापूंच्या समाधीवर मानाची भगवी चादर चढविण्यात येईल. गेल्या बारा वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेल्या या उपक्रमात स्थानिक युवक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन सामाजिक एकोप्याचे दर्शन घडवतात.
चार दिवस चालणाऱ्या या मुख्य उत्सवात उत्सव समितीतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेत गरमागरम भजी आणि खास गुळाच्या जिलेबीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होते. लहान मुलांच्या मनोरंजनासाठी आकाश पाळणे, रहाट पाळणे, मेरी गो राऊंड आणि विविध खेळणी व फुग्यांच्या दुकानांनी परिसर गजबजून जातो. तसेच महिला व गृहिणींसाठी संसारोपयोगी वस्तू, सौंदर्यप्रसाधने आणि बेनटेक्स दागिन्यांची दुकानेही सजली आहेत. यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या कुस्त्यांच्या जंगी फडामुळे कुस्ती शौकिनांना अस्सल मर्दानी खेळाची मेजवानी मिळणार आहे.
नथ्थू बापूंच्या यात्रोत्सवासाठी केवळ एरंडोल व जळगाव जिल्ह्यातीलच नव्हे, तर मुंबई, पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात (सुरत) आणि मध्य प्रदेशातूनही हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होतात. उत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी उत्सव समिती व प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
