- Hindi News
- राज्य
- साकोळ येथील प्रियदर्शनी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
साकोळ येथील प्रियदर्शनी विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा

शिरूर अनंतपाळ (प्रतिनिधी) : तालुक्यातील साकोळ येथील प्रियदर्शनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारतीय संविधान दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सामुदायिक संविधान वाचन आणि जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात सकाळच्या प्रार्थनेनंतर सामुदायिक संविधान वाचनाने करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी संविधानातील प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये आणि तत्त्वांचे स्मरण केले. त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य श्री. पोसाने व एल. व्ही. सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व विशद केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. लोकशाही व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करून त्यातील मूल्यांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमानंतर संविधान दिनानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली.या रॅलीत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत संविधानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री पोसाने व सूर्यवंशी एल. व्ही. शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
