- Hindi News
- राज्य
- नवापूरच्या सोढा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
नवापूरच्या सोढा विद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
विद्यार्थ्यांची न्यायालयाला भेट, निबंध व पोस्टर स्पर्धांचे आयोजन

नवापूर (प्रतिनिधी) : दि नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती प्र. अ. सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल आणि हाजी ए. एम. व्होरा कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर येथे भारतीय संविधान दिन विविध शैक्षणिक व जनजागृतीपर उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री. मिलिंद सर्जेराव वाघ होते. प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्याध्यापक श्री. नारायण मराठे, पर्यवेक्षक श्री. संजयकुमार जाधव आणि कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्रीमती मेघा पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानाची उद्देशिका यांच्या प्रतिमांचे पूजन प्राचार्य श्री. मिलिंद सर्जेराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर संविधान दिनानिमित्त संविधान दिनाची शपथ श्री. भरत सैंदाणे यांनी दिली. भारतीय संविधानाची निर्मिती, ऐतिहासिक पार्श्वभूमी, संविधान सभेचे कार्य आणि संविधानातील मूलभूत मूल्ये यांविषयी श्री. दिनेश खैरनार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
संविधान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी ‘संविधानाचे महत्त्व’ या विषयावर निबंध स्पर्धा तसेच संविधानविषयक पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संविधानातील लोकशाही मूल्ये, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये आणि सामाजिक समतेचा संदेश सर्जनशील पद्धतीने व्यक्त करण्याची संधी मिळाली.
या निमित्ताने दुपारी २ वाजता विद्यालयापासून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये इयत्ता नववी तसेच अकरावी कला व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी नवापूर येथील न्यायालयाला भेट दिली. या भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे न्यायालय परिसरात न्यायाधीशांच्या उपस्थितीत प्रा दिनेश खैरनार यांनी दिवाणी व फौजदारी न्यायालय नवापूर येथील अधिकारी कर्मचारी वकील बांधव यांच्या उपस्थितीत नागरिकांसह विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले.
याप्रसंगी दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, नवापूर येथील श्रीमती बी. एच. परमार, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, नवापूर येथील श्री. डी. एस. देवरे तसेच नवापूर तालुका वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. न्यायाधीश आणि वकील संघाच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. तसेच भारतीय न्यायव्यवस्था, न्यायालयाचे कार्य आणि लोकशाही व्यवस्थेतील न्यायपालिकेचे स्थान यांची माहिती घेतली व न्यायपालिकेचे कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी केली.
या सर्व उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी आदर, लोकशाही मूल्यांची जाणीव, नागरिकांचे हक्क व कर्तव्ये यांची समज आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना रुजविण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संविधान दिनाचा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
