- Hindi News
- मुंबई
- जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन
जात वैधतेचे अर्ज, सुनावणी अन् प्रमाणपत्र वितरण ऑनलाइन

मुंबई (प्रतिनिधी) : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने आता संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार जात वैधता प्रमाणपत्रासाठीचे अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. अर्जदारांना अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, आवश्यकतेनुसार सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित चॅटबॉटच्या माध्यमातून अर्जदारांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या सहकार्याने आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) तांत्रिक सहकार्याने जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्यात आली आहे. यापूर्वी १ ऑगस्ट २०२० पासून जात पडताळणी समित्यांचे कामकाज अंशतः ऑनलाइन सुरू होते. मात्र, आता अर्जदारांना कागदपत्रांच्या प्रती कार्यालयात प्रत्यक्ष जमा करण्याची आवश्यकता राहणार नाही.
जात वैधतेसाठीचा अर्ज केवळ ऑनलाइन प्रणालीद्वारेच स्वीकारला जाणार असून, अन्य कोणत्याही मार्गाने सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जदारांना मूळ किंवा प्रमाणित कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. जात नोंदीसंदर्भातील आणि मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासासंदर्भातील प्रत्येकी किमान एक दस्तऐवजी पुरावा सादर करणे आवश्यक आहे. असा पुरावा उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येईल. आवश्यकतेनुसार समिती अतिरिक्त पुराव्यांची मागणी करू शकते.
ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्यानंतर समिती कार्यालयातील लिपिकाकडून अर्जाची तांत्रिक तपासणी केली जाईल. अर्जातील तपशील, कागदपत्रांची उपलब्धता, त्यांची वाचनीयता आणि मूळ प्रती स्कॅन करून अपलोड केल्या आहेत की नाही, याची खातरजमा केली जाईल. त्रुटी आढळल्यास त्या अर्जदाराला कळविण्यात येतील. त्यानंतर सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी अर्ज आणि पुराव्यांची गुणवत्तेच्या आधारे पडताळणी करतील. जात दावा आणि रहिवास सिद्ध होत असल्यास अर्ज वैधतेसाठी समिती अध्यक्ष व सदस्यांकडे पाठविला जाईल.
समितीच्या अध्यक्षांसह अन्य दोन सदस्यांकडून अर्जाची आणि पुराव्यांची पडताळणी केली जाईल. पुरावे योग्य आढळल्यास डिजिटल स्वाक्षरीने जात वैधता प्रमाणपत्र जारी केले जाईल. मात्र, पुराव्यांची संबंधित आस्थापनांकडून पडताळणी आवश्यक असल्यास त्यासाठी पत्रव्यवहार केला जाईल. तसेच दक्षता पथकाकडून चौकशी आवश्यक वाटल्यास प्रकरण त्यांच्याकडे पाठविण्यात येईल.
