- Hindi News
- राज्य
- जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौरा सुरू करणार
जरांगे पाटील ७ डिसेंबरपासून राज्याच्या दौरा सुरू करणार

जालना (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतल्यानंतर सरकारला संबंधित मागण्यासाठी काहीकाळ अवधी दिला आहे. मात्र, राज्यातील मराठा बांधवांच्या आरक्षण प्रमाणपत्राच्या समस्या आणि कुणबी कास्ट व्हॅलिडीटीच्या अडचणींशी अद्यापही विद्यार्थ्यांना, उमेदवारांना तोंड द्यावे लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा केली आहे. येत्या ७ डिसेंबरपासून त्यांचा महाराष्ट्र दौरा सुरू होणार आहे.
जरांगे राज्यातील विविध जिल्ह्यांना भेटी देणार असून प्रत्येक जिल्ह्यात एक दिवस देण्यात येणार आहे. दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम १ डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळालेले नाही, हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र मिळाले आहे की नाही, यासह प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या विविध अडचणी जरांगे पाटील प्रत्येक जिल्ह्यातील मराठा बांधवांकडून जाणून घेणार आहेत.
