- Hindi News
- राज्य
- ५ किमी पांदण रस्ता स्वखर्चाने मोकळा; सोयगाव पंचायत समितीचे ठराव प्रलंबित असल्याने घोसला ग्रामस्थांचा...
५ किमी पांदण रस्ता स्वखर्चाने मोकळा; सोयगाव पंचायत समितीचे ठराव प्रलंबित असल्याने घोसला ग्रामस्थांचा स्वावलंबी बाणा
मातोश्री व बळीराजा पांदण रस्ता योजनांचे प्रस्ताव धूळखात; पशुधन व शेतीमालाच्या वाहतुकीसाठी शेतकरी एकवटले


सोयगाव (प्रतिनिधी) : सोयगाव पंचायत समितीकडे मातोश्री पांदण रस्ता आणि बळीराजा पांदण रस्ता योजनांसाठी दोन वेळा ठराव सादर करूनही अद्याप मंजुरी मिळालेली नसल्याने, घोसला येथील शेतकऱ्यांनी अखेर शासकीय प्रतीक्षेला फाटा देत सुमारे ५ किलोमीटर लांबीचा पंज्यात्तर मियां पांदण रस्ता स्वखर्च आणि श्रमदानातून तयार केला आहे. प्रशासनाच्या या उदासीनतेविरोधात शेतकऱ्यांनी स्वावलंबनाचा मार्ग निवडत यंत्रणेला जणू जाग आणून दिली आहे.घोसला शिवारातील या महत्त्वाच्या पंज्यात्तर मियां पांदण रस्त्यासाठी मातोश्री आणि बळीराजा पांदण रस्ता योजनेंतर्गत काम व्हावे म्हणून सोयगाव पंचायत समितीकडे दोन वेळा रीतसर ठराव देण्यात आले होते. तसेच रस्त्यांना नंबर मिळावा म्हणून यापूर्वी अनेकदा अभियंता राजगुरू यांनी पाहणीही केली. मात्र, अद्याप रस्त्याला नंबर मिळालेला नाही आणि दोन्ही योजनांच्या मंजुरीची प्रतीक्षा कायम असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
घोसला गावातील पशुधनाची दररोजची ये-जा याच मुख्य पंज्यात्तर मियां पांदण रस्त्याने होते. सुमारे ५ किमीचा हा रस्ता खड्डेमय आणि अतिखराब झाल्याने पशुधन सांभाळताना, शेतात जाणे-येणे करताना आणि तयार झालेला शेतमाल घरी आणताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. त्यातच संभाव्य दुष्काळाची चाहूल लागल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली होती.या सर्व अडचणींवर मात करत ग्रामस्थांनी व शेतकऱ्यांनी एकत्र येत ट्रॅक्टर-ट्रॉली आणि जेसीबीच्या साहाय्याने माती टाकून व सपाटीकरण करून रस्ता दुरुस्त केला. या स्वखर्च आणि श्रमदानाच्या कामात सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, गोरखभाऊ चव्हाण, भूषण बावस्कर, देवा बावस्कर, भूषण वाघ, कल्पेश वाघ यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.
"शासकीय योजना केवळ कागदावरच राहतात आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, याचे हे जिवंत उदाहरण आहे. सोयगाव पंचायत समितीकडे वारंवार ठराव देऊन आणि पाहणी होऊनही मंजुरी मिळाली नाही, म्हणून आम्हाला स्वखर्चातून आणि श्रमदानातून ५ किमीचा हा रस्ता करावा लागला," असे सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी सांगितले.
पांदण रस्ते हे शेतीच्या अर्थकारणाची आणि पशुधनाच्या दळणवळणाची जीवनवाहिनी आहेत. सोयगाव पंचायत समिती व प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन प्रलंबित ठराव व योजनांना मंजुरी द्यावी आणि कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
