- Hindi News
- राज्य
- पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर शस्त्रांचा थरार; गोळीबारानंतर कोयत्याने हल्ला, एकजण गंभीर जखमी
पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर शस्त्रांचा थरार; गोळीबारानंतर कोयत्याने हल्ला, एकजण गंभीर जखमी
न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ जवळ भरदिवसा घडली घटना; हल्लेखोर पसार, पोलिसांकडून तपास सुरू

पुणे (प्रतिनिधी) : पुण्यातील शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात बुधवारी दुपारी हिंसक प्रकार घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. न्यायालयाच्या गेट क्रमांक ४ बाहेर एका व्यक्तीवर गोळीबार केल्यानंतर कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मंदार किवळे हा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे हा काही कामानिमित्त न्यायालयात आला होता. याचवेळी काही हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. सुरुवातीला गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्यानंतर धारदार कोयत्याने त्याच्यावर वार करण्यात आले. या हल्ल्यात त्याच्या दोन्ही हातांना गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
पाच ते सहा हल्लेखोरांचा सहभाग?
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाच ते सहा जणांनी मिळून संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. त्यापैकी एका व्यक्तीकडे बंदूक होती, तर इतरांनी कोयत्याने वार केल्याचे सांगण्यात येत आहे. हल्लेखोरांनी स्वतःची ओळख सांगताना 'आम्ही कात्रजचे भाई आहोत', असे म्हटल्याचा दावाही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. जखमीला मदत करण्यासाठी रुग्णवाहिकेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
न्यायालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
या घटनेनंतर न्यायालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. न्यायालय परिसरात पोलीस चौकी आणि सुरक्षा व्यवस्था असतानाही हल्लेखोरांनी शस्त्रांसह हल्ला केल्याने वकिलांसह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुप्रिया सुळे यांच्याकडून संताप व्यक्त
या घटनेवर खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. पुणे शहराची सुरक्षित शहर म्हणून असलेली ओळख गुन्हेगारीमुळे धोक्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. न्याय मिळवण्यासाठी नागरिक ज्या न्यायालयात येतात, त्याच परिसरात अशा प्रकारची हिंसक घटना घडणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
अमोल कोल्हे यांची कठोर कारवाईची मागणी
खासदार अमोल कोल्हे यांनीही या घटनेचा निषेध केला. न्यायदानाच्या ठिकाणीच अशा प्रकारे शस्त्रांचा वापर होणे ही राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची चिंताजनक स्थिती दर्शवणारी बाब असल्याचे त्यांनी म्हटले. गृह विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी कठोर धोरण अवलंबावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील बंदोबस्त वाढवला आहे. हल्ल्यामागील नेमके कारण, आरोपींची भूमिका आणि घटनेशी संबंधित इतर बाबींचा तपास सुरू आहे.
