- Hindi News
- राज्य
- शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत...
शिंदखेडा तालुक्यात अवकाळी पावसाच्या अनुदानाचा घोळ! मंजूर यादीत नावे, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा नाही; ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने शेतकरी त्रस्त!
शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या; शिवसेनेचा तहसीलदारांना निवेदनाद्वारे इशारा!
शिंदखेडा (प्रतिनिधी) : शिंदखेडा तालुक्यातील चिरणे आणि कदाने येथील शेतकऱ्यांचे सन २०२४-२५ मध्ये मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे शासनाच्या वतीने अधिकृत पंचनामे करण्यात आले होते. त्यानंतर शासनाकडून नुकसानभरपाई अनुदानही मंजूर करण्यात आले.मात्र, अनुदानाच्या मंजूर यादीत नावे समाविष्ट असूनही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मदतीची रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे, संबंधित तलाठी कार्यालयात चौकशी केली असता शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यास सांगितले जात आहे. मात्र, मागील तीन महिन्यांपासून ई-केवायसीसाठीचे ऑनलाइन पोर्टल बंद असल्याने शेतकऱ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येत नसल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.एकीकडे अवकाळी पावसामुळे आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी आणि दुसरीकडे तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले शासनाचे अनुदान, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडले आहेत.या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने शिंदखेडा तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात चिरणे व कदाने येथील अनुदान मंजूर असूनही मदत न मिळालेल्या शेतकऱ्यांची यादी तपासावी, ई-केवायसी पोर्टल बंद असल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, ऑनलाइन प्रक्रिया शक्य नसल्यास ऑफलाइन कागदपत्रे स्वीकारण्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम तातडीने जमा करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.तसेच, अनुदान वितरणातील विलंबाची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही न केल्यास शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी तालुकाप्रमुख प्रकाश चौधरी उप तालुकाप्रमुख भालचंद्र पाटील बांधकाम कामगार सेनेचे उपजिल्हाप्रमुख विठ्ठल पाटील तालुकाप्रमुख भूषण पवार उपतालुकाप्रमुख मगन लांडगे, मोहन चौधरी माजी सरपंच उपस्थित होते.आता प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि चिरणे-कदाने येथील वंचित शेतकऱ्यांना त्यांचे रखडलेले अनुदान कधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
