- Hindi News
- राज्य
- आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन
आलियाबाद पुलाखाली पुन्हा मगरीचे वावर; नदीपात्रात न उतरण्याचे तहसीलदारांचे आवाहन

नळदुर्ग (प्रतिनिधी): नळदुर्ग शहराजवळील आलियाबाद पुलाखाली बोरी नदीच्या पात्रात पुन्हा मगर दिसून आल्याने परिसरात सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नळदुर्ग अपर तहसील प्रशासनाने खबरदारीचा इशारा दिला असून, कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
बोरी नदी परिसरात शेतकरी, पशुपालक तसेच ग्रामस्थांची नियमित वर्दळ असते. शेतीच्या कामासाठी आणि जनावरांना पाणी पाजण्यासाठी अनेकजण नदीकाठी जातात. तसेच नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी येणारे पर्यटकही या परिसरात फिरत असतात. मात्र, नदीपात्रात पुन्हा मगरीचे दर्शन झाल्याने नागरिक आणि जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. नदीपात्रात पाणी पिण्यासाठी, जनावरांना पाणी पाजण्यासाठी किंवा शेतीच्या कामासाठीही उतरू नये. मगरीला जवळून पाहण्याचा प्रयत्न करू नये तसेच फोटो किंवा व्हिडिओ काढण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. लहान मुलांना नदीकाठी खेळण्यासाठी पाठवू नये, नदी परिसरात अनावश्यक गर्दी करू नये आणि मगरीचे दर्शन झाल्यास तातडीने तहसील कार्यालयाला माहिती द्यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे धाडस न करता स्वतःची, कुटुंबीयांची आणि जनावरांची सुरक्षितता जपावी. संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रमोद गायकवाड यांनी केले आहे.
