- Hindi News
- राज्य
- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर समितीचा तीन कोटींचा हातभार!
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तुळजाभवानी मंदिर समितीचा तीन कोटींचा हातभार!
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तीन कोटींचा धनादेश सुपूर्द- आ. राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

धाराशिव (प्रतिनिधी) : राज्यासह धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल तीन कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. मंदिर समितीचे विश्वस्त तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली.
गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तीन कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक माया माने आणि सहकारी राहुल पाटील सास्तुरकर उपस्थित होते.
यंदा अत्यल्प पर्जन्यमानामुळे धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद झाले आहे. शेतीचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यामुळे सर्वसामान्य नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा कठीण परिस्थितीत शासनाच्या मदतकार्यात हातभार लागावा आणि संकटग्रस्तांना आधार मिळावा, या उदात्त भावनेतून तुळजाभवानी मंदिर समितीने तीन कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, मंदिर समितीने सामाजिक उत्तरदायित्वाची ही परंपरा यापूर्वीही जपली आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत बाधितांना मदत मिळावी, यासाठी समितीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले होते. यंदा दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन मदतीची रक्कम तीन कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
आई तुळजाभवानी हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. भाविकांच्या श्रद्धेतून प्राप्त होणाऱ्या निधीचा उपयोग केवळ धार्मिक कार्यापुरता मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि संकटग्रस्त घटकांच्या मदतीसाठीही व्हावा, या भूमिकेतून मंदिर संस्थानने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मंदिर समितीच्या या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
संकटाच्या काळात गरजूंच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. आई तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने राज्यातील तसेच धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांना या संकटावर मात करण्याचे बळ मिळो आणि दुष्काळाचे सावट लवकर दूर होऊन सर्वत्र सुख-समृद्धी नांदो, अशी प्रार्थना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली.
