विद्यापीठांनी रोजगाराभिमुख शिक्षणाला प्राधान्य द्यावे – राज्यपाल

नवोन्मेष, कौशल्य विकास आणि उद्योजकतेतून विद्यार्थ्यांनी विकसित भारताच्या निर्मितीत योगदान द्यावे; शिवाजी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात आवाहन

Maharashtra Sarthi Team Picture
On

WhatsApp-Image-2026-11-27-at-5.45.58-PM-e1795785100848-1024x579

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यापीठांनी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता, विश्लेषणात्मक विचारक्षमता, सर्जनशीलता, प्रभावी संवादकौशल्य आणि उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करण्यावर भर द्यावा. तसेच भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवोन्मेष, कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे. तर विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान, कौशल्यांचा उपयोग करावा, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाचा 63 वा दीक्षांत समारंभ राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली व भारताचे माजी लष्कर प्रमुख तथा मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटचे मानद कर्नल आणि अरुणाचल प्रदेशचे माजी राज्यपाल जनरल जे.जे. सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊ सभागृहात पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. राजनीश कामत, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, प्र. कुलगुरु डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखा अधिकारी सुहासिनी पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल जिष्णू देव वर्मा म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देत असून त्यांच्या नावाने उभारलेल्या शिवाजी विद्यापीठाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे. या विद्यापीठाने सहा दशकांहून अधिक काळ कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील गावे, शहरे आणि तालुक्यांपर्यंत उच्च शिक्षणाचा प्रकाश पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. या प्रदेशाच्या विकासात विद्यापीठाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

पदवी ही केवळ एका विद्यार्थ्याचा शैक्षणिक गौरव नसून समाजात घडत असलेल्या परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण प्रतीक असते. उच्च शिक्षणातील महिलांचा वाढता सहभाग ही सर्वसमावेशक विकासाचे सकारात्मक प्रतिबिंब आहे. मात्र, उच्च शिक्षणातील तरुणांचे घटते प्रमाण गांभीर्याने विचार करण्याजोगे आहे. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणातील सहभाग वाढवण्यासाठी एकूण पटनोंदणी वाढवण्यास प्राधान्य द्यावे. आर्थिक, भौगोलिक, सामाजिक अडथळ्यांमुळे गुणवंत तरुणाला उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागू नये, यासाठी ‘स्कूल कनेक्ट’ सारख्या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडत असनू या धोरणातील बाबींचे प्रतिबिंब विद्यापीठांचे प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरण आणि कार्यपद्धतीत दिसून यावे. तसेच विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनांमध्ये वैज्ञानिक उत्कृष्टतेइतकेच मानवी मूल्यांना महत्त्व द्यावे.

उच्च शिक्षण, संशोधन, नवोन्मेष आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून भरीव सहकार्य मिळत आहे. विद्यापीठांनी या संधींचा पुरेपूर लाभ घेवून उद्योगक्षेत्र, संशोधन संस्था, स्थानिक समुदाय तसेच जगभरातील विद्यापीठांशी सहकार्याचे नवे पूल निर्माण करावेत.

सध्या तंत्रज्ञानात अभूतपूर्व परिवर्तन होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, स्वयंचलन, क्वांटम तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान यामुळे उद्योगविश्व, रोजगाराच्या संधी आणि संपूर्ण समाजव्यवस्थेचे स्वरुप बदलत आहे. पदवीधर विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतांचे आकलन करण्याबरोबरच यातील मर्यादा आणि परिणामांची जाणीव ठेवावी.

उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यापीठांना सज्ज करण्याच्या दृष्टिने राजभवनात ‘फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी फोरम’ सुरु करण्यात आला आहे. या फोरमचे नेतृत्व प्रा. डॉ. राजनीश कामत करत असल्याचे सांगून त्यांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.

कोल्हापूर जिल्ह्यात औद्योगिक आणि आर्थिक विकासाची प्रचंड क्षमता आहे. या प्रदेशातील औद्योगिक आणि आर्थिक परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने योगदान द्यावे. उद्योगक्षेत्रातील भक्कम भागीदारीमुळे नवोन्मेषाला चालना देण्यासाठी उत्पादकता वाढवण्यासाठी आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यासाठी विद्यापीठातील शैक्षणिक तज्ज्ञता आणि संशोधन क्षमतेचा उपयोग सहकारी संस्था, फौंड्री, अभियांत्रिकी, वस्त्रोद्योग तसेच जगप्रसिद्ध कोल्हापुरी चपलेशी संबंधित पारंपरिक कारागिरांच्या विकासासाठी व्हावा.

युवा पदवीधरांनी बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता विकसित करावी. आपल्या ज्ञानात सातत्याने भर घालावी आणि तंत्रज्ञानातील आव्हानांचे संधीत रुपांतर करावे.  विकसित भारताचे स्वप्न साकार करताना विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय परिवर्तनाचे केवळ साक्षीदार न राहता त्याचे सक्रिय शिल्पकार व्हावे. आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजसेवेसाठी, वंचितांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी आणि राष्ट्राच्या बळकटीसाठी करावा. संवेदनशील आणि जबाबदार नागरिक व्हावे. विकसित, सर्वसमावेशक आणि प्रगतशील भारताच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन पदवीधर विद्यार्थ्यांना राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

खबरें और भी हैं

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ताजा बातम्या

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

बुलढाणा (प्रतिनिधी)  राज्यात दुष्काळाचे मोठे संकट निर्माण झाले असले, तरी शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. संकटात शेतकऱ्याला...
राज्य 
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर; सर्वतोपरी मदतीची ग्वाही – एकनाथ शिंदे

ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

नवी दिल्‍ली प्रतिनिधी - भारतीय रेल्वेने आज उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल मार्ग प्रकल्पातील 6.59 किलोमीटर लांबीच्या ‘बोगदा क्रमांक 14’चे...
राष्ट्रीय 
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेलमार्ग प्रकल्पातील 6.59 किमी लांबीच्या बोगदा-14 च्या खोदकामात मोठे यश..

धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

धुळे प्रतिनिधी - शेतकऱ्याला चाकूचा धाक दाखवून कापूस विक्रीचे १० लाख ७५ हजार रुपये लुटून नेणाऱ्या टोळीचा शोध धुळे पोलिसांनी...
क्राईम 
धुळ्यात शेतकर्‍याचे १० लाख रुपये लुटणार्‍यांना पोसिसांनी पकडले..

दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..

मुंबई प्रतिनिधी - संपर्क मंत्रालयाच्या दूरसंवाद विभागाने, आपल्या मुंबई परवाना सेवा क्षेत्राच्या (मुंबई एलएसए) माध्यमातून देशव्यापी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा स्पर्धेची घोषणा...
राज्य 
दूरसंवाद सेवा आणि सायबर सुरक्षा याविषयी दूरसंवाद विभागाची मुंबई आणि महाराष्ट्रातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रश्नमंजूषा..