शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

Maharashtra Sarthi Team Picture
On

82e9761e-405e-4ac6-b6d4-c8bb8549d161

धाराशिव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-शिवाई बसचे तिकीट दर साध्या लालपरीच्या तुलनेत अधिक असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना या बसचा लाभ घेणे परवडत नाही. त्यामुळे शिवाई बसचे तिकीट दर तातडीने कमी करून लालपरीच्या बरोबरीने करावेत, अन्यथा प्रवाशांना सोबत घेऊन आगारासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे.
यासंदर्भात मनसेच्या वतीने परिवहन मंत्री आणि धाराशिव विभाग नियंत्रक यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार, महिला आणि विद्यार्थ्यांना गर्दीच्या लालपरीऐवजी आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध व्हावा, या हेतूने शासनाने ई-शिवाई बस सुरू केली. या निर्णयाचे मनसेने स्वागत केले होते. मात्र, शिवाई बसचे तिकीट दर साध्या एसटीपेक्षा दीडपट अधिक ठेवल्याने सर्वसामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
तिकीट दर अधिक असल्यामुळे प्रवासी नाइलाजाने गर्दीच्या लालपरीतून प्रवास करीत आहेत, तर दुसरीकडे लाखो रुपये खर्च करून उपलब्ध केलेल्या शिवाई बसेस अनेक मार्गांवर रिकाम्या किंवा अत्यल्प प्रवाशांसह धावत असल्याचा दावा मनसेने केला आहे. यामुळे इंधन अथवा चार्जिंग, देखभाल दुरुस्ती आणि टोलचा खर्च वाढून एसटी महामंडळाचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे.
शिवाई बसवर कार्यरत असलेल्या कंत्राटी चालकांना दररोज ३०० किलोमीटरपेक्षा अधिक प्रवास करूनही केवळ १८ ते १९ हजार रुपये वेतन मिळत असल्याचा मुद्दाही मनसेने उपस्थित केला आहे. या कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमानुसार योग्य वेतन व भत्ते देण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
ई-शिवाई बसचे तिकीट दर तातडीने कमी करून लालपरीच्या बरोबरीने आणावेत, प्रवाशांची गर्दी असलेल्या मार्गांवर शिवाई बसेस सुरू कराव्यात, रिकाम्या धावणाऱ्या बसेसचे मार्ग बदलण्यात यावेत, तसेच या योजनेचे टेंडर कोणाला आणि कोणत्या अटींवर देण्यात आले, याची चौकशी करून माहिती सार्वजनिक करावी, अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. तिकीट दर कमी करणे शक्य नसल्यास महामंडळाचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी ही योजना बंद करून त्या मार्गांवर साध्या लालपरीच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे. एसटीचे ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवून सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी सेवा उपलब्ध करून द्यावी, असे मनसेने म्हटले आहे.
या मागण्यांवर १५ दिवसांत निर्णय न झाल्यास प्रवाशांना सोबत घेऊन आगारासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती परिवहन मंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव आणि एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष महेश जाधव, तुळजापूर तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, विधानसभा अध्यक्ष मयूर गाढवे, तालुका सचिव धनाजी साठे, तुळजापूर शहराध्यक्ष धर्मराज सावंत, शहर उपाध्यक्ष अविनाश पवार, समीर शेख आणि सोमेश्वर आलुरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

खबरें और भी हैं

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

ताजा बातम्या

हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

जळगाव (प्रतिनिधी) : वसमत येथील हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
जळगाव 
हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालयात संविधान गौरव दिन उत्साहात साजरा

शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

धाराशिव (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ई-शिवाई बसचे तिकीट दर साध्या...
राज्य 
शिवाई बसचे दर लालपरीच्या बरोबरीने करा; अन्यथा मनसेचे आंदोलन

ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

जळगाव (प्रतिनिधी) : महात्मा गांधी विद्यालय, भादली बु. येथे दिनांक २७ नोव्हेंबर २०२६ रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे ‘पुष्प चौथे’ उत्साहपूर्ण...
जळगाव 
ज्ञानाची देवाणघेवाण, अनुभवांची शिदोरी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास!

देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही

देवळाली कॅम्प (प्रतिनिधी) : देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत दिवसाआड पाणीपुरवठा होत असतो. ज्या दिवशी पाणी येतो, त्या दिवशी लाईट जाऊ...
नाशिक  
देवळाली कॅम्पला पाणी येण्याच्या दिवशी लाईट जाणार नाही